नवी दिल्ली – “आप’च्या दिल्लीतील आमदार अलका लांबा यांनी आज आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चांदनी चौक मतदारसंघातून त्या दिल्ली विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील लोकांबरोबर चर्चा केल्यानंतरच आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि “आप’बरोबरच्या तीव्र मतभेदांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2014 च्या निवडणूकीमध्ये केजरीवाल यांनी दिवंगत शीला दीक्षित यांना “आप’ने भ्रष्टाचारी म्हटले होते.
मात्र अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्नही केला, त्याला आपला आक्षेप होता, असे लांबा यांनी सांगितले. “आप’ आपल्या तत्वांपासून फारकत घेत आहे. प्रशांत भूषण, शांति भूषण, योगेंद्र यादव आणि कुमार विश्वास यांच्यासारख्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आता पक्ष केवळ मतपेढीच्या राजकारणाचा आणि सत्तेत कसे रहायचे याचाच विचार करतो आहे, असे अलका लांबा म्हणाल्या. विधानसभेची आगामी निवडणुक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“आप’बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकावेत आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा, असे आपल्या मतदारसंघातील लोकांचेही मत आहे. त्यानुसार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा देणार नाही. आपल्या मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत.
सीसीटिव्ही लावण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मोहल्ला क्लिनिकही अद्याप बांधण्यात आलेली नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण यापुढेही पाठपुरावा करत राहणार आहोत. असे लांबा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.