आळंदी – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र आळंदी देवाची (ता. खेड) येथे आवारी हॉस्पिटलच्या माध्यमातून बेटी बचाव अभियानातंर्गत गर्भवती स्त्रियांना मुलगी झाल्यास 50 टक्के सवलत तसेच सिझेरियन पद्धतीने मुलगी झाल्यास 25 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे आवारी हॉस्पिटलच्या डॉ. जोत्स्ना आवारी यांनी सांगितले.
मुलीच्या जन्माचे स्वागत उत्साहात आणि आनंदाने व्हावे, स्त्री ही कुठेही कमी राहिलेली नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती उत्तुंग भरारी घेत आहे. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे असे डॉ. आवारी यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेचा शुभारंभ बेटी बचाव जनआंदोलनाचे प्रमुख डॉ. गणेश राक यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी डॉ. सुनील आवारी, डॉ. बाळासाहेब गायकवाड, डॉ. विकास पाटील, डॉ. स्मिता पाटील, डॉ. अपर्णा शिंदे, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. प्रमोद लोहार आदी उपस्थित होते. विठ्ठल कृपा मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक सुदाम मते, सुयोग कांबळे, शैलेश सावतडकर, सुलतान शेख, सचिन शिंदे, महादेव पाखरे, गिरीश तुर्की यांनी विशेष सहकार्य केले.