नगर – जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात 2027 पर्यंत गावपातळीवर शून्य कुष्ठरुग्ण हे उद्दिष्ट ठेवले असून ते गाठण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यात सुमारे 40 लाख 99 हजार 601 लोकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आठ लाख 19 हजार 920 घरोघरी जाऊन प्रशिक्षित टीममार्फत प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे, अशी माहिती क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पालिका दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, सर्व शासकीय दवाखाने यांच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजार 50 टीम तयार केल्या आहेत. टीममध्ये 4 हजार 100 प्रशिक्षिणार्थ आरोग्य कर्मचारी राहणार आहेत. यात आशा स्वयंसेवक व एक पुरुष स्वयंसेवक आहेत. हे प्रत्येक गावात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत तपासणी करतील. टीममधील सर्व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्यांचे कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्ह्यात 410 टीम पर्यवेक्षक निवडले आहेत. ते सर्वेक्षणाच्या वेळी पर्यवेक्षण व मार्गदर्शन करून संशयितांची यादी करतील. त्यांना संदर्भ सेवेसाठी जवळच्या उपकेंद्रात पाठवतील. या सर्वांची तपासणी वैद्यकीय अधिकारी सात दिवसांत करतील. लक्षणे असल्यास आपल्या घरी येणाऱ्या टीमला दाखवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यंत्रणेने केले आहे. सक्रिय शोधमोहीम जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविली जात आहे.
अशी आहेत लक्षणे
अंगावरील फिकट लालसर चट्टा, चकाकणारी तेलकट त्वचा, अंगावर गाठी असणे, हातापायाला बधिरता असणे, अशी लक्षणे असलेले तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी त्वरित तपासणी करून घ्यावी.