कोपरगाव – येथील कोपरगाव पीपल्स बॅंकेने सन 2022-23मध्ये उल्लेखनीय प्रगती केल्याने बॅंकेला बॅंकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बॅंको ब्ल्यू रिबन ऍवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे पूर्व मुख्य सरव्यवस्थापक पी. के. अरोरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बॅंकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, सुनील बोरा, हेमंत बोरावके यांनी स्वीकारला.
बॅंकेचे अध्यक्ष ठोळे म्हणाले की, बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, मार्च 2023 अखेरपर्यंत बॅंकेकडे 6 कोटी 57 लाख रुपये भागभांडवल, 40 कोटी 41 लाख निधी, 275 कोटी 60 लाख ठेवी, 144 कोटी 4 लाख गुंतवणूक, 161 कोटी 9 लाख कर्जे व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 2 कोटी 37 लाख इतका झाला आहे.
बॅंकेला ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे. बॅंकेचा सी.आर.ए.आर हा 19.84 टक्के इतका आहे. तसेच सी.आर.आर. व एस.एल.आर. मध्ये एकदाही उल्लंघन झालेले नाही. या सर्व बाबींचा विचार करून बॅंकेला सहकारातील बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार बॅंकेच्या नावलौकिकात भर घालणारा आहे. सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांनी वेळोवेळी घेतलेल्या कष्टामुळे व त्यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.