नागपूर – महापालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि बेफिकीर कारभारामुळे तरुणीचा जीव गेल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. ही घटना येथील हनुमान नगर झोन कार्यालयात घडली. नरसाळा परिसरात नाल्याच्या पाण्याने रस्ता जलमय झाला होता. यावेळी अत्यवस्थ असलेल्या एका तरुणीला उपचाराला उशीर झाल्याने जीव गमवावा लागला, असा आरोप शिवसेना आणि तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, नाल्याच्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि बेफिकीर कारभारामुळे तरुणीला आपला जीव गमवावा लागला असे शिवसैनिकांनी आरोप करत ने हनुमान नगर झोनमध्ये आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करीत झोन कार्यालयात चांगलाच राडा घातला आणि तोडफोड केली.
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 29, नरसाळा येथील राष्ट्रसंत नगरमध्ये राहणाऱ्या जान्हवी विंचूरकर या 17 वर्षीय तरुणीची प्रकृती 31 ऑगस्टच्या रात्री बिघडली. तिच्यावर तातडीने उपचाराची गरज होती. मात्र घराभोवती साचलेल्या पाण्यामुळे न अॅम्ब्युलन्स येऊ शकत होती, ना आजारी व्यक्तीला घरातून बाहेर काढता येत होते.
सकाळी कसेतरी तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर उशीर होऊन जानव्हीचा दुर्दैवी मृत्यू झाला.