नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थ प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. सुशांत प्रकरणात तिला सातत्याने लक्ष्य केले जात असताना आता कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी तिच्या बचावासाठी रिंगणात उतरले आहेत.
भारतीय जनता पार्टीने राजकीय फायद्यासाठी सुशांतला बिहार कलाकार करून टाकले अशी टीका अधीर रंजन यांनी केली. मात्र त्याचवेळी रिया बंगाली ब्राह्मण असल्याचे विधानही त्यांनी करून टाकले. तिच्या अटकेच्या कारवाईबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
अधीर रंजन चौधरी यांनी यासंदर्भात पाच ट्वीट केले असून त्यात म्हटले आहे की, दिवंगत कलाकार सुशांत सिंह राजपूत भारतीय कलाकार होते. मात्र भाजपने राजकीय लाभासाठी त्यांना बिहारी कलाकार करून टाकले. रियावर हत्येचा आरोप नाही किंवा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचाही आरोप नाही. तिला अंमली पदार्थ प्रकरणाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. केंद्रीय तपास संस्था सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठीच काम करत आहेत. सागर मंथनातून या संस्थांनी अमृत आणण्याऐवजी ड्रग्ज शोधून काढले आहे. इतके दिवस झाल्यावरही ते अजुनही अंधरातच चाचपडत आहेत.
आपल्या ट्वीटमध्ये चौधरी पुढे म्हणतात की रियाचे वडील लष्करात होते. त्यांनी देशाची सेवा केली आहे. रिया एक बंगाली ब्राह्मण महिला आहे. तिच्या वडीलांनाही आपल्या मुलीसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. सुशांतला न्याय म्हणजे एका बिहारीला न्याय अशी न्यायाची व्याख्या असू नये. कोणत्याही प्रकरणाची मीडियामध्ये ट्रायल होउ नये. ते आपल्यासाठी शुभ संकेत नाही. सगळ्यांना न्याय मिळावा हाच आपल्या घटनेचा सार आहे.