- सामाजिक सुरक्षा पथकाचा काळेवाडीतील सायबर कॅफेवर छापा
पिंपरी – आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन विमा, पोलीस क्लिअरन्स सर्टीफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. काळेवाडी येथील एका सायबर कॅफेतून 800 ग्राहकांना अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे समोर आले आहे. सायबर कॅफेवर गुरुवारी (दि. 4) छापा मारून एक लाख 21 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
राहुल प्रसाद गौंड (वय 33, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय 23, रा. थेरगाव), तुकाराम अर्जून मगर (वय 30, रा. काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय 25, रा. चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह इतर दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौंड हा काळेवाडी येथील आशीर्वाद सायबर कॅफेत विविध कागदपत्रे बनावट तयार करून देतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. आरोपी गौंड याच्या व्हाटस ऍपवर त्याचे इतर साथीदार माहिती देत होते. त्यावरून गौंड हा संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सीरियल क्रमांक व फोटो तयार करून त्याची प्रिंट काढून त्याच्याकडील बनावर शिक्के मारून कलर झेरॉक्स प्रिंट काढून त्याचा फोटो व्हाटस ऍपव्दारे त्याच्या इतर साथीदारांना पाठवून देत असे. तसेच त्यांच्याकडून गुगल पेव्दारे पैसे स्वीकारत होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल व संगणकामधील माहिती डिलीट करीत होता.
संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करीत असताना आरोपी ग़ौंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तीन हजार 880 रुपयांची रोकड, एक लाख 10 हजार 400 रुपयांचे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, सात हजारांचा मोबाईल फोन, 300 रुपये किमतीचे तीन बनावट रबरी स्टॅम्प, असा एकूण एक लाख 21 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.