नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या गोंधळातील आरोपीला अमृतसरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणात गुरजोत सिंग (वय 21) याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली.
लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील गुरजोत सिंग हा फरार होता. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात सामील असलेल्या दीप सिद्धू, जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तर जजबीरसिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलिसांनी लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबाबत कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते, त्यात पोलिसांनी लाल किल्ल्यावरील हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचे म्हटले होते. या हिंसाचाराची पूर्व तयारी झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंसाचार अचानक झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण लोक घटनास्थळी शस्त्रे घेऊन पोहचले होते. त्यांच्याकडे तलवार, हॉकी, स्टिक अशी शस्त्रे होती. तेथे त्यांनी बराच गोंधळ घातला, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. ट्रॅक्टरसह मोटारसायकलींवर बसलेल्या सुमारे तीनशे जणांनी लाल किल्ल्यता प्रवेश केला आणि गोंधळ केला.