– हिमांशू
कुठल्याशा पालिकेत घोटाळे झाले होते का हो? कुणीतरी म्हटलं होतं, बऱ्याच पालिकांमध्ये झालेत… काही आठवतंय का? कुणाच्या सत्ताकाळात झाले? ह्यांचे घोटाळे मोठे की त्यांचे? चोर कोण, कोतवाल कोण? उलट्या बोंबा कुणाच्या? कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना? विसरलात? जाऊ दे, अजून बरंच काही विसरायचंय. तुमच्या मेंदूला मर्यादा आहेत हो… नवं काही आत शिरलं की जुनं बाहेर पडतंय बघा! परवा-परवाच एका विषयावरून जाम भांडला होतो आपण… आठवतंय का? नाही ना? असो, जोपर्यंत आमच्यावर काही येत नाही तोपर्यंत आम्ही भांडणार. आजतरी आम्ही सेफ आहोत; पण तुमचं काय? अडकलातच ना शेवटी एका प्रकरणात? अहो, नाही कसं म्हणता? आमच्याकडे व्हिडिओ आहे तुमचा, कबुलीनामा देतानाचा!
ज्या सोशल मीडियावर थोड्याच वेळापूर्वी तुम्ही तावातावानं भांडत होतात ना, त्याच मीडियावर तुमचा व्हिडिओ अपलोड होईल… थोड्याच वेळात! खोटं नाही, अगदी खरं! अर्थात, खऱ्या-खोट्याची फिकीर हल्ली करता कुठं तुम्ही? आली पोस्ट… कर फॉरवर्ड! तपासणी नाही, शहानिशा नाही, परिणामांचा विचार नाही… अगदी आम्हाला हवी तशी मानसिकता तयार झालीये तुमची. आता आम्ही तुम्हाला हवं तसं नाचवू शकतो. खऱ्या-खोट्यामधली सीमारेषा तुम्ही स्वतःच पुसून टाकलीये; त्यामुळं आम्ही काहीही म्हटलं तरी तुम्हाला मान्य करावंच लागेल. “त्या’ व्हिडिओच्या आधारे तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय. थोड्याच वेळात अटक!
बापरे! सोशल मीडियावर भांडता-भांडता हे काय होऊन बसलं? कसला व्हिडिओ? कसला गुन्हा? कसला कबुलीनामा? असा विचार तुम्ही करत असतानाच डोअरबेल वाजेल. दारात पोलीस असतील. दार उघडताच तुमच्या मुलाबाळांसमोर ते तुम्हाला उचलतील. कोठडीत डांबून चौकशी सुरू करतील. पोलिसांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही, कारण तुम्हाला मुळात प्रकरणच माहीत नाहीये. तक्रारदाराचं नावही तुम्हाला ठाऊक नाहीये. पण गुन्हा गंभीर आहे आणि आरोपी तुम्हीच आहात. बक्कळ फटके खाऊनसुद्धा जेव्हा तुम्ही तोंड उघडणार नाही, तेव्हा पोलीस तुम्हाला “तो’ व्हिडिओ दाखवतील. तुम्ही चक्रावून जाल… जी घटना ठाऊकच नाही ती आपणच घडवल्याचं कबूल कसं केलं आपण? कधी? तेही कॅमेऱ्यासमोर!
गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच तुम्हाला कोर्टासमोर उभं केलं जाईल. तिथं “तो’ व्हिडिओ पुन्हा दाखवला जाईल. व्हिडिओत तुम्हीच दिसत असाल… आवाजही तुमचाच असेल. तुमचा काडीमात्र संबंध नसताना… काहीतरी गडबड आहे. कुणी केला हा व्हिडिओ? आपण असे कसे बोललो? तुम्ही विचारमग्न असतानाच न्यायाधीश तुमची रवानगी कोठडीत करण्याचा आदेश देतील. जामीन मिळणार नाही, कारण गुन्हा अजामीनपात्र आहे.
मेंदू फुटतो की काय, अशी तुमची अवस्था करून टाकणारा हा धोका तुमच्या अगदी जवळ आलाय. त्याचं नाव आहे “डीप फेक’! मित्रांनो, सरकारं येतील आणि जातील; पण हा धोका एकदा तुमच्या घरात शिरला, की जाण्याचं नाव घेणार नाही. राजकारण्यांवर आरोप होतील आणि मागेही घेतले जातील. आज एफआयआर होईल आणि उद्या क्लीन चिट मिळेल. तिथं खऱ्या-खोट्याला किंमतच नाही; पण आपला स्वतःच्याच काना-डोळ्यांवरचा आणि मेंदूवरचाही विश्वास उडाला तर?