नवी दिल्ली – पंजाबमधील सत्तारूढ आपचे आमदार जसवंतसिंग गज्जन माजरा (Jaswant Singh Gajjan ) यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. बॅंक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली.
ईडीच्या पथकाने एका बैठकीतून जसवंत यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींतर्गत अटक करण्यात आली. जसवंत यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले. मात्र, ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्याने पुढील कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली.
संबंधित प्रकरणी ईडीने याआधी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जसवंत आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. दरम्यान, आपच्या पंजाब शाखेने जसवंत यांना अटक करण्याच्या पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
जसवंत यांना सार्वजनिक स्वरूपाच्या बैठकीतून ताब्यात घेण्यात आले. त्यातून आपला बदनाम करण्याचे भाजपचे राजकारण उघड होते, अशी टीका आपने केली. आपमध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासूनच जसवंत यांच्या विरोधात संबंधित प्रकरण दाखल असल्याचेही त्या पक्षाने नमूद केले.