Video : सार्वजनिक शौचालयात थाटला संसार? गॅस, बेड, गाद्या अन् बरच काही.. मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील भांडूप पश्चिमेतील सुभाष नगर येथील सार्वजनिक शौचालयात काही लोकांनी बेकायदा अतिक्रमण करून तिथेच पूर्ण संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गॅस, बेड, कपडे, भांडी-कुंडी असा सगळा संसार शौचालयातच सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे यांनी परिसराची पाहणी केली असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे शौचालय आता पूर्णपणे अतिक्रमणकर्त्यांच्या ताब्यात गेले आहे. रात्रीच्या वेळी काही जण तिथेच बसून दारू पितात, नशेत पडून राहतात. परिसरातील आणि आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांतील महिला रात्री-अपरात्री शौचाला येतात, पण पुरुषांचा वावर आणि मद्यपान यामुळे त्यांना प्रचंड भीती वाटते, असं मनिषा तुपे यांनी यावेळी सांगितले.
View this post on Instagram
या ठिकाणी जर एखाद्या महिला किंवा मुलीवर अत्याचारासारखा गंभीर गुन्हा घडला तर जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल मनिषा तुपे यांनी उपस्थित केला. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवण्याची आणि महिलांसाठी स्वच्छ-सुरक्षित शौचालय उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, पालिका प्रशासन झोपलेलं का आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणामुळे भांडूप परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चर्चा सुरू झाली असून, पालिकेकडून तातडीची कारवाई अपेक्षित आहे.





