Newasa News : नेवासे फाटा येथे व्यावसायिकांकडून अतिक्रमण; वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त

नेवासे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गेल्या दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीवर तोडगा काढला होता. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, वाहनचालकांना हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजातून आणि विस्कळीत वाहतुकीतून मार्ग काढावा लागत आहे. या दोन चौकांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना नाकीनऊ येत असून, अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रसामग्री आणि निधी खर्च केला होता. मात्र, महिनाभरातच पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाल्याने शासनाच्या या कारवाईला केवळ नौटंकीचा ठपका ठेवला जात आहे. नेवासे फाट्यावरील महामार्गावर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटली असून, या व्यावसायिकांना कोणाचा “राजाश्रय” लाभला आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नेवासे फाट्यावरील प्रस्तावित उड्डाणपूल उभारल्यास स्थानिक व्यवसायांचे वैभव संपुष्टात येईल, अशी भीती सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. उड्डाणपूल आल्यास व्यावसायिकांना व्यवसाय बंद पडण्याची वेळ येऊ शकते, असेही मत व्यक्त होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी वेळीच अतिक्रमण हटवून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांचे पालन न करता कोणाच्या सूचनांवर काम करत आहे, असा आरोपही जनतेतून होत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी खर्च झालेला वेळ आणि पैसा वाया गेला असून, पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीचे भूत नेवासकरांच्या मानगुटीवर बसले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
राजमुद्रा चौकातील दुर्घटना कोणाच्या निष्काळजीपणामुळे?
राजमुद्रा चौकात ऊसाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला चिरडल्याने एका निष्पाप बाप-लेकाचा जीव गेला होता. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





