Pune News : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर उद्या (७ डिसेंबर २०२५) मेगाब्लॉग असल्याने विविध एक्सप्रेस गाड्या तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाने लोणावळा-कल्याण विभागात आर अँड डी अप आणि डाउन लाईन्स विस्तारणासाठी आणि अप यार्डमध्ये एक अतिरिक्त लाईन घेण्यासाठी ६ आणि ७ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. हा ब्लॉक २:१५ ते संध्याकाळी ६:१५ या वेळेत असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून, पुणे-लोणावळा उपनगरीय (लोकल) गाड्यांवरही या ब्लॅागचा मोठा परिणाम होणार आहे. विशेषत: महापरिनिर्वाण दिवसाच्या (६ डिसेंबर) पार्श्वभूमीवर प्रवाशांना अडचणी येऊ शकतात, म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकिट रद्द किंवा बदलण्यासाठी IRCTC पोर्टल किंवा स्थानक काउंटरचा वापर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.