नगर – माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
नगर तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी स्व. दादापाटील शेळके यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या नगर तालुका बाजार समिती निवडणुकीतही महाआघाडी विरुद्ध कर्डिले गट अशी लढत झाली होती. त्यात अंकुश शेळके यांनी महाआघाडीकडून उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.
दादा पाटील शेळके यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके हे महाआघाडीचे नेतृत्व करत आहेत.महाआघाडीच्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे अंकुश शेळके यांचा भाजप प्रवेश महाआघाडीसाठी धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाआघाडीला धूळ चारण्यासाठी कर्डिले यांनी हा डाव टाकल्याचे बोलले जात असून त्यांच्याच पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे.