देवाभाऊंना एक फोन अन्…; पुण्यातील भाजप नेत्याने सांगितला अनुभव म्हणाले “लहान भावासारखी…” नेमकं काय घडलं?

BJP leader Jagdish Mulik : पुण्यातील भाजप नेते जगदीश मुळीक यांची नुकतीच अँजिओग्राफी करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती कळताच त्यांनी तात्काळ डॅाक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर थेट त्यांनी मुळीक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेला फोन आणि आलेला अनुभव पुण्यातील भाजप नेते जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शेअर केला आहे.
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही, असे मुळीक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणि परिस्थिती लक्षात घेऊन ….
फक्त तीन मिनिटांतच देवाभाऊंनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, “जगदीश, उद्या दुपारी चार वाजता डॉ. रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचं आपण ठरवू.” दुसऱ्या दिवशी मी डॉ. पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तात्काळ अँजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशीच माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीचं झालं की कोणाशी काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. त्या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्यासोबत ठाम उभे राहिले.
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर…
या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार.
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
यासोबतच जगदीश मुळीक यांनी डॅाक्टरांचे देखील आभार पोस्टमधून मानले आहेत. या काळात माझ्या उपचारासाठी तत्परतेने मदत केलेल्या डॉ. रमाकांत पांडा तसेच त्यांची संपूर्ण टीम, डॉ. ज्ञानेश गवारे आणि डॉ. अभिजित लोढा यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण सेवेमुळे आणि देवभाऊंच्या संवेदनशील तत्परतेमुळे आज मी पुन्हा एकदा बळकट उभा आहे. माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, कार्यकर्त्यांचे आणि सर्व जनतेचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. सध्या माझी तब्येत सुधारते आहे आणि काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी लवकरच पुणेकरांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे, असा विश्वास जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : दिल्ली स्फोटाचा थरकाप उडवणारा नवा व्हिडीओ अखेर समोर ; पहा त्या क्षणी नेमकं काय घडलं?





