निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना जोरदार झटका, काँग्रेसलाही खिंडार

नंदुरबार : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात मोठी राजकीय हालचाल घडली आहे. शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का देत अक्कलकुवा तालुक्यातील दोन माजी सरपंचांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अक्कलकुवा विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी यांचे समर्थक मानले जाणारे काकडखुंटचे माजी सरपंच विनोद वडवी आणि सोनपाटीचे माजी सरपंच कुवरसिंग पाडवी यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला.
भाजप नेत्या डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही कमळ हाती घेतलं. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिंदे गटासह काँग्रेसलाही खिंडार पडल्याचं बोललं जात आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका २ डिसेंबरला होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. अशातच या घडामोडींमुळे नंदुरबारमधील राजकीय समीकरणं नव्याने आकार घेत आहेत.





