हरिहरेश्वर – हरिहरेश्वर येथे फोटो काढत असताना महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्यामुळे समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिला पर्यटकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यटकांने पाण्यात उडी घेतली. महिला पर्यटकास वाचविण्यात तालुका प्रशासनास यश आले. मात्र पुरुष पर्यटकास त्याच्या प्राणास मुकावे लागले.
विकास काळे असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकास काळे (वय 53) आणि मनिषा जयेश मेटेदळे (वय 49) हे पुण्यातील पर्यटक हरिहरेश्वर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले. पोहण्यासाठी गेलेल्या मनिषा मेटेदळे यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यामध्ये मनिषा मेटेदळे समुद्रामध्ये बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी विकास काळे यांनी पाण्याचा अंदाज न घेता समुद्रात उडी मारली. संध्याकाळी चार वाजता समुद्राला भरती आली असल्याने दोघेही खोल समुद्रात बुडाले.
पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी मनिषा मेटेदळे यांना प्रशासनाच्या व साळुंके रेस्क्यू टीम श्रीवर्धन यांच्या प्रयत्नाने वाचविण्यात यश आले. तर विकास काळे यांचा बुडून मृत्यू झाला. काही वेळातच विकास काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघाताचा तपास श्रीवर्धन पोलीस करीत आहेत.