ऐन महानगरपालिका निवडणुकीत मनसेला मोठा धक्का; अनेक दिग्गजांनी सोडली साथ, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मुंबई : राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांचे नेते जोरदार प्रचार करत असून, दररोज सभा आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र या प्रचारासोबतच पक्षांतरांचं सत्रही वेगाने सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेची चिंता वाढली आहे. या पक्षांतराचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असतानाच मनसेला हा मोठा हादरा बसला आहे. मनसेचे डोंबिवली उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे, शाखा अध्यक्ष अनिकेत गायकवाड, शाखा अध्यक्ष दिपेश धुरी, मनविसे डोंबिवली शहर सचिव चैतन्य सावंत, मनविसे विभाग सचिव सर्वेश लोंढे यांच्यासह योगेश पडवळ, निलेश निरकर, अनिकेत सावंत, अभिषेक गायकवाड आणि रोहन वगळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे डोंबिवली परिसरात भाजपची ताकद वाढली असून मनसेला मोठा धक्का बसला आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवारीही मनसेला सलग दोन धक्के बसले होते. मुंबईतील मनसेचे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऐन निवडणुकीच्या काळात मनसेची ताकद कमी होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख नेतृत्वाने प्रेरित होऊन मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
मनसेचे डोंबिवली उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे, शाखा अध्यक्ष अनिकेत गायकवाड, शाखा… pic.twitter.com/lT7ZdoO5n2— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 7, 2026
संतोष धुरी यांच्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस राजाभाऊ चौगुले यांनीही राज ठाकरे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ॲड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर आणि संतोष यादव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता.
सलग दोन दिवसांत झालेले हे पक्षांतर मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असून, ऐन निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांच्यासमोरील आव्हाने अधिक वाढल्याचं चित्र आहे.





