नागपूर : आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, या सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री व भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नागपूर येथे ही माहिती दिली. महायुतीने या निवडणुकांमध्ये ५१ टक्के मतांचा आकडा गाठून मोठा विजय मिळवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना त्यांच्या स्थानिक स्तरावर महायुती करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांच्या वाटपात काही अडचणी येऊ शकतात, मात्र अशा प्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा अविभाज्य भाग आहे आणि ते आगामी निवडणुकीत महायुतीसोबतच असतील. मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये झालेले केवळ ‘मतभेद’ आता पूर्णपणे दूर झाले असून ‘मनभेद’ अजिबात नव्हते, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही महायुती सज्ज आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल. यासाठी भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी चर्चा करणार आहेत. जर मतभेद निर्माण झाले, तर वरिष्ठ नेते त्यावर निश्चितपणे तोडगा काढतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. या धोरणात्मक निर्णयामुळे महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.