प्रभात वृत्तसेवा चाकण – चाकण शहरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे येथे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. काही दिवसांत चाकण महानगरपालिका म्हणून विकसित करावी लागेल असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथे बोलताना केले.चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे केले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री वाडेकर व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते व पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ह्या सुसंस्कृत व त्यांना राजकीय वारसा आहे. चाकण शहरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे येथे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथे कचरा समस्या, पाणी टंचाई, ट्रॅफिक समस्या, लोकांना राहणा-यासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. कचर्या समस्या निवारण बाबत मध्यप्रदेश शहरातील इंदूर शहरासारखी पुणे जिल्ह्यातील तीन शहर निवडण्यात येणार होते. त्यात चाकण शहराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा समस्यांचे पूर्ण निवारण करण्यात येणार आहे.चाकण म्हणजे मिनी भारत आहे. येथे इंडस्ट्रीज वाढत आहे. उद्योगधंदे नवनवीन या भागात येत आहेत. बारामतीने 35 वर्षे मला साथ दिली. कसलीही लाट येवू द्या बारामती फक्त दादा म्हणतात. तशी साथ तुम्ही मला द्या. मी बारामतीचा विकास केला तसा आम्ही तुमचा करू. तुम्ही बारामती सारखी आम्हाला साथ द्या मी शब्दाचा, कामाचा पक्का आहे. मी पुणे जिल्ह्यातील आहे. त्यामुळे बाहेरील कोणी येईल मी हे करू ते करू असे सांगून जातील. पण आपल्याला आपल्या समस्या माहीत आहे. डीपीआरचा प्रश्न लवकर सोडवणार येत्या काही दिवसांत चाकण महानगरपालिका म्हणून विकसित करावी लागेल. मी स्वतः ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी स्वतः लक्ष घातले आहे. आता पावसाळा संपला आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येईल. चाकण शहरात डीपीआरचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. मी पालकमंत्री आहे याबाबत तो प्रश्न लवकरात लवकर मार्गही काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मी सर्वांना विश्वासात घेऊन येथील विकासाबाबत डीपीआरचा प्रश्न लवकर सोडवणार असून, पिण्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. भामा आसखेड धरणातून सुधारित पाणी चाकण शहरासाठी आरक्षित करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येतील.