नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतरांची मालिका सुरूच आहे. भाजप-शिवसेना युतीचे जवळपास ७० नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. मनसेला (MNS) यामुळे सलग धक्के बसताना दिसत आहेत. माजी नगरसेवक व मनसेचे सरचिटणीस संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी पक्ष शिवसेनेच्या स्वाधीन केल्याचा आरोप करत मनसे नेतृत्वावर टीकाही केली. धुरी यांच्या पाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का बसला असून, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी आमदार नितीन भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश या राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो माजी आमदार नितीन भोसले यांचा पक्षप्रवेश. अवघ्या १० दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले नितीन भोसले यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. २५ डिसेंबर रोजी त्यांचा भाजप प्रवेश झाला होता. मात्र, नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून भोसले यांच्या भावजयी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, भाजपकडून तिकीट नाकारल्याने अवघ्या दहा दिवसांतच त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेत इनकमिंगची रांग नितीन भोसले यांच्यासह माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ तसेच काँग्रेस नेते शाहू खैरे यांनीही शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, नितीन भोसले यांच्या भाजप प्रवेशावेळी भाजप कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता. मंत्री गिरीश महाजन यांनाही भाजप समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याच नितीन भोसले यांनी आता शिवसेनेत प्रवेश केल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.