कर्जत, दि. 20 – कर्जत तालुक्यातील खांडपे येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांच्यावतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी 50 हजारांहून अधिक शौकिनांनी गर्दी केली आहे. नियोजनबद्ध आयोजन पाहून खासदार सुनील तटकरे यांनी आयोजक सुधाकर घारे यांचे कौतुक केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे, मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, जेष्ठ नेते भगवान भोईर, महिला अध्यक्षा रंजना धुळे, सरपंच नमिता घारे, माजी सरपंच मधुकर घारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, जस राजकपूरला ग्रेट शोमॅन म्हणायचे तसे अलीकडच्या काळातील कार्यक्रमाचा ग्रेट शोमॅन कोण असेल तर ते सुधाकर घारे आहेत. आमदार सुनिल शेळके म्हणाले की, आमच्याकडे चार बैलांची स्पर्धा असते. इकडे दोन बैलांची स्पर्धा आहे. बैले किती आहेत यापेक्षा अधिक या कार्यक्रमाचे नियोजन कसे आहे, हे महत्वाचे आहे. हजारोंच्या संख्येने माणसे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सुधाकर घारे यांच्यामुळे पाहायला मिळाली.
सकाळी 11 वाजता हनुमंत पिंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच माजी सरपंच परशुराम घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली. प्रथम मानाची बैलगाडा शर्यत झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
खांडपे गावाला जत्रेचे स्वरूप
विजेत्या बैलगाडा मालकाच्या रकमेत तालुक्याच्या इतिहासात प्रथम कोणतीही कपात केलेली नव्हती. या बैलगाडा शर्यंतीच्यावेळी विविध खाद्य पदार्थांची स्टॉल लावण्यात आल्याने खांडपे गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.