पुणे ,{प्रभात वृत्तसेवा} – परदेशातून आलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची बतावणी करुन सायबर भामटे नागरिकांकडून पैसे उकळत आहेत. अशाच बाणेर भागातील एका डाॅक्टरची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी एका डाॅक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डाॅक्टरच्या मोबाइल क्रमांकावर भामट्यांनी संपर्क साधला. “तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकिट पाठवले आहे. मुंबई विमानतळावर ते जप्त करण्यात आले आहे. त्यात पाच पासपोर्ट, अमली पदार्थ, परदेशी चलन, लॅपटाॅप सापडला आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असून, त्वरीत चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल,’ अशी बतावणी चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली.
भामट्यांनी त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन भामट्यांनी खात्यातून एक कोटी एक लाख ३० हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.