Rahul Gandhi – मनरेगा हा फक्त रोजगार कार्यक्रम नव्हता, तर जगभरात कौतुक मिळालेली विकास चौकट होती. हा कायदा रद्द करणे म्हणजे हक्कांशी आधारीत असलेल्या दृष्टिकोनावर आणि देशाच्या संघराज्यांच्या रचनेवर केलेला हल्ला आहे. हा कायदा म्हणजे राज्यांवर आणि गरीबांवर केलेला विनाशकारी हल्ला आहे, जो पंतप्रधानांनी नोटाबंदीप्रमाणेच एकट्याने केला. आपल्या मंत्रीमंडळाला न विचारता, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता पंतप्रधानांनी मनरेगा नष्ट केले आहे, असा हल्लाबोत लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीमध्ये मनरेगा आणि जी-राम-जी या नव्या कायद्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. याचर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, केंद्रातील भाजप सरकारवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना, राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही याला विरोध करणार आहोत. मला खात्री आहे की संपूर्ण विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल,” असे ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसच्या ‘मनरेगा बचाव अभियाना’चा उल्लेख केला, जे ५ जानेवारी रोजी देशभरात सुरू करण्याची योजना आहे. २० वर्षे जुन्या मनरेगा योजनेची जागा घेणारे ‘व्हीबी-जी-राम-जी विधेयक’ संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधादरम्यान संसदेत मंजूर करण्यात आले. या नवीन कायद्यात ग्रामीण मजुरांसाठी १२५ दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची तरतूद आहे.