नवी दिल्ली – संसदेत सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ झाला. त्यासाठी मतदारयाद्या पडताळणीवर (एसआयआर) चर्चेची मागणी लावून धरत विरोधकांनी स्वीकारलेला आक्रमक पवित्रा कारणीभूत ठरला. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत सध्या मतदारयाद्या पडताळणी सुरू आहे. त्या प्रक्रियेवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याचे पडसाद संसद अधिवेशनातही उमटले. एसआयआरवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडली. राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी त्यावर सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एसआयआरवर चर्चा करण्याविषयी सरकारची कुठली हरकत नाही. मात्र, विरोधकांनी त्यासाठी कुठल्या कालमर्यादेचा आग्रह धरू नये, असे त्यांनी म्हटले. त्या उत्तराने समाधान न झाल्याने अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. लोकसभेतही विरोधक एसआयआरवरून आक्रमक मुडमध्ये दिसले. त्या प्रक्रियेचा निषेध अन् घोषणाबाजी करत विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. दुपारनंतरही गदारोळ कायम राहिल्याने दिवसभरासाठी त्या सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.