पाथर्डी – स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये कार चालक प्रदीप काकासाहेब खाटीक याचा गाडीखाली सापडून मृत्यू झाला आहे. गाडीतली विकास जावळे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाडीतील अन्य दोन जणांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मृत प्रदीप काकासाहेब खाटीक (वय 29, रा. पाथरवाले, ता. नेवासा) व कैलास चेडे, गणेश नवले (रा. भेंडे), विकास जावळे (नागापूर, अ. नगर) हे रविवारी (ता. 2) स्विफ्ट कारमधून बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव येथे मित्राच्या लग्नाला गेले होते.
लग्न लावून परत आपल्या गावी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जाताना औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावरील पाथर्डी तालुक्यातल्या खर्डा फाटा या ठिकाणी मारुती स्विफ्ट कार (एमएच 12 जीएफ 8289) उलटली.
त्यामध्ये खाटीक हे गाडी चालवत असल्याच्या बाजूने गाडी पलटल्याने त्यांचे डोके दरवाजाच्या खिडकीतून बाहेर येऊन ते गाडीखाली सापडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात माजी नगरसेवक नामदेव लबडे, शिवाजी सपकाळ यांनी मदत केली.