पुणे- मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभ शहरातील 4 लाख 92 हजार 138 मिळकतधारकांना घेता येणार आहे. दरम्यान, एवढी सूट देऊनही या योजनेतून किती मिळकतधारक कर भरतील, हे मुदत संपल्यानंतरच स्पष्ट होईल.
मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने अभय योजना राबवण्याला नुकतीच मान्यता दिली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये थकबाकीदारांना दंडाच्या रकमेवर 80 टक्के सूट देण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, सरसकट माफी देण्यास कॉंग्रेस, शिवसेना व अन्य विरोधी पक्षांनी विरोध करत 50 लाखांपर्यंतच्याच थकबाकीदारांसाठी ही योजना राबवण्याची उपसूचना दिली.
करोनासारखी गंभीर परिस्थिती असल्याने 30 सप्टेंबरपर्यंत मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये 15 टक्के सूट देण्याचीही उपसूचना दिली. उपसूचनांसह एकमताने प्रस्तावास मान्यता देण्यात आली. ही योजना 2 ऑक्टोबर ते 30 नाव्हेंबर या दरम्यान राबवण्यात येणार आहे.
थकबाकीदारांची संख्या…
1 ते 10 हजार रुपये : 1 लाख 94 हजार 258 थकबाकीदार. 10 ते 50 हजार रुपये : 1 लाख 94 हजार 125 थकबाकीदार. 50 ते 1 लाख रुपये : 36 हजार 398 थकबाकीदार. 1 ते 5 लाख रुपये : 57 हजार 751 थकबाकीदार. 5 ते 25 लाख रुपये : 8 हजार 827 थकबाकीदार. 25 ते 50 लाख रुपये : 779 थकबाकीदार आहेत.
मिळकतकर येणे बाकी…
शहरातील एकूण 4 लाख 92 हजार 138 मिळकतकर थकबाकीदारांकडून 3 हजार 138 कोटी 64 लाख 63 हजार 543 रुपये थकबाकी येणे बाकी आहे. यात मूळ मिळकत कराची रक्कम 1 हजार 395 कोटी 56 लाख 67 हजार 540 रुपये आहे तर शास्तीची रक्कम 1 हजार 743 कोटी 7 लाख 96 हजार 3 रूपये इतकी आहे.