पुणे – अंतिम वर्ष परीक्षेची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना “मॉक टेस्ट’ देता येणार आहे. ही सराव परीक्षा “एमकेसीएल’ या संस्थेच्या वतीने घेण्यात येणार आहे.
यंदा राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ स्वरुपात होणार आहे. करोना पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षांची पूर्वतयारी करता यावी, विद्यार्थ्यांमधील भीती दूर व्हावी, यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितकडून (एमकेसीएल) अभिरुप (मॉक) ऑनलाइन परीक्षेची सुविधा mockexams.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मागील तीन दिवसांत 26 हजार विद्यार्थ्यांनी याची नोंदणी केली.
याद्वारे विद्यार्थ्यांना कितीही वेळा ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार आहे. ही सुविधा 31 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. या संकेतस्थळावर विद्यापीठनिहाय पदवी अभ्यासक्रमातील विषयांसंबंधी चाचणी देण्यात येणार नसून, आकलन, उपयोजन आदी कौशल्यांसह भाषिक आणि तार्किक कौशल्ये तपासणाऱ्या क्षमता आणि चाचण्या होणार आहेत.
यामुळे सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा कशी असते, हे समजण्यास मदत होणार आहे. विद्यापीठांचे विषयनिहाय सराव प्रश्नसंच पब्लिक डोमेनमध्ये पुनर्वितरणासाठी उपलब्ध झाल्यास ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा सरावदेखील करता येणार आहे. याशिवाय, परीक्षेसाठी केवळ सराव सुविधा उपलब्ध आहे. संकेतस्थळावर कोणत्याही विद्यापीठाची औपचारिक अंतिम परीक्षा घेतली जाणार नसल्याचे एमकेसीएलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.