पुणे – “माझे कुटुंब माझी जबाबदारी’, मोहिमेंतर्गत महापालिकेने पहिल्या फेरीत 20 लाख 15 हजार 195 नागरिकांची तपासणी केली असून त्यातून 912 जणांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.
करोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी “ट्रेस, ट्रॅक, ट्रिट’ या त्रिसूत्रीचा वापर केला जात आहे. तरीही संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम जाहीर केली आहे. या अनुषंगाने महापालिकेकडूनही शहरात ही मोहीम राबवली जात आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्पा 10 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येत असून, यासाठी 1 हजार 26 पथके कार्यरत करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात 1 आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा स्वयंसेवक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक पथकाकडून दररोज 50 घरांना भेटी देऊन, यात घरातील सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी तपासणे, कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या पालिका रुग्णालयात पाठवण्याचे काम केले जात आहे.
या मोहिमेंतर्गत 2 ऑक्टोबरपर्यंत शहरातील 6 लाख 38 हजार 356 भेटी देऊन 20 लाख 15 हजार 195 नागरिकांची तपासणी केली आहे. यात 1 लाख 20 हजार 792 व्यक्तींना विविध आजार असल्याचे आढळून आले असून, यापैकी 7 हजार 602 व्यक्तींना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले; तर 912 जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले असून त्यांना योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.