गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या कालावधीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टी आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान या तीन खान अभिनेत्यांनी झाकोळून टाकले आहे या तीन खान अभिनेत्यांची प्रभावळ कायम असतानाच अधून-मधून चमकून जाणारेही काही अभिनेते असतात. तर या खानाच्या प्रभावलीला आव्हान देऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे काही अभिनेते असतात असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेत्यांमध्ये प्रामुख्याने इरफान खान चे नाव घ्यावे लागते. ज्या काळात आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान यांचे नेहमीच्या पठडीतील चित्रपट गाजत होते त्याच कालावधीमध्ये इरफान खान पान सिंग तोमर यासारखे चित्रपट करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत होता.
त्याने ही वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे आज वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळत आहे कारण इरफान खान ज्या पद्धतीचे आणि ज्या दर्जाचे चित्रपट करत होता त्या पद्धतीचे चित्रपट निर्माण होण्याचे प्रमाण सध्या वाढत असतानाच या अष्टपैलू अभिनेत्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. पण त्याने गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये केलेले काम पाहता हिंदी चित्रपट सृष्टी असो किंवा हॉलिवूड असो त्याचे नाव नेहमीच आदराने घेतले जाणार आहे. आपल्या संघर्षाच्या कालावधीमध्ये टीव्हीपासून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या इरफानची अभिनयाची झेप खूप मोठी होती.
चित्रपट हे माध्यम व्यवसाय म्हणून स्वीकारल्याने त्याने आरंभीच्या कालावधीमध्ये काही व्यावसायिक चित्रपट स्वीकारले. पण नंतरच्या अभिनयाला प्राधान्य देणारे चित्रपट स्वीकारून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याकडे वाटचाल चालू ठेवली. पानसिंग तोमर या चित्रपटापासून समीक्षक आणि जाणकार प्रेक्षक यांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. आपल्या भूमिकेचा विचार न करता काहीतरी सामाजिक आशय असणारे चित्रपट स्वीकारन्यालाच इरफानने नेहमी प्राधान्य दिले. त्यामुळेच पिकू सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटात तो बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समोर आत्मविश्वासाने उभा राहू शकला. खरे तर या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्याभोवतीच संपूर्ण कथा फीरत असतानाही इरफान चे काम लक्षात राहते.
लंच बॉक्स सारख्या चित्रपटातही केवळ नजरेची भाषा आणि देहबोली यातून इरफान प्रेक्षकांपर्यंत कथा पोहोचवतो. अशा अनेक चित्रपटांची नावे घेता येऊ शकतात पडद्यावरील या सहज आणि आत्मविश्वासपूर्ण वापरामुळेच त्याला हॉलीवूडमध्ये अनेक महत्त्वाचे चित्रपट करण्याची संधी मिळाली लाइफ ऑफ पाय स्लमडॉग मिलेनियर जुरासिक वर्ड अमेझिंग स्पायडरमॅन यासारख्या चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांची गर्दी असतानाही इरफान आपल्या वेगळ्या अभिनयाने उठून दिसला. पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीतही त्याचे अनेक फॅन त्यामुळेच निर्माण झाले भारतीय चित्रपट सृष्टीत इतर कोणीही प्रमुख अभिनेते नसून इरफान खान हा एकमेव आघाडीचा अभिनेता आहे. अशा प्रकारचे समजही काही काळ परदेशात त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाले होते. खरेतर हिरो होण्यासारखी देहयष्टी व्यक्तिमत्व नसल्यानेच इरफान अनेक वेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकला.
अनेक दिग्गज दिग्दर्शकांनी त्याला आपल्या चित्रपटांमध्ये स्थान दिले साधारण दोन वर्षांपूर्वी त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले आणि काही काळ त्याचे काम थांबले. पण परदेशात वैद्यकीय उपचार करून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात परतलेल्या इरफानने अंग्रेजी मेडियम हा आपला चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटातील त्याचे भूमिकेचे ही कौतुक झाले केवळ इरफानला समोर ठेवून आणि अभिनयाला प्राधान्य देणारे अनेक चित्रपट नजीकच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता होती. पण आता इरफानचा काळाच्या पडद्याआड गेल्याने ते शक्य नाही वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी आपला जीवन प्रवास संपणाऱ्या इरफानने भारतीय आणि परकीय मनोरंजनसृष्टी मध्ये आपले नाव निश्चितच कधीही न पुसल्या जाणाऱ्या शाईमध्ये कोरून ठेवले आहे. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकणार्या त्याच्या चित्रपटांमधून ‘इरफान’चे दर्शन अधूनमधून प्रेक्षकांना होतच राहील. पण त्याच्याकडून यापेक्षाही जास्त काही अपेक्षित होते याची हुरहुर ही त्याच्या प्रेक्षकांना कायम सलत राहील.