- महापालिका कर्मचाऱ्याकडून असंवेदनशीलतेचा कळस
- तब्बल अकरा तासांनी उचलला आयटी अभियंत्याचा मृतदेह
पिंपरी – जुनी सांगवी येथील आयटी अभियंत्यांचा मृतदेह तब्बल 11 तासांनी महापालिकेने नेला. मात्र तो मृतदेह उचलण्यासाठी शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली. या घटनेमुळे सांगवी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
शिंदेनगर, जुनी सांगवी परिसरात एकटे राहणाऱ्या एका संगणक अभियंत्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबत महापालिकेला कळवूनही तब्बल 11 तास मृतदेह पडून होता. महापालिकेने पोलिसांना मृतदेह उचलण्यास सांगितला.
मात्र पोलिसांनी हे आमचे काम नाही, असे म्हणत मृतदेह उचलण्यास नकार दिला. सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका शिंदेनगरमध्ये आली. त्यामध्ये फक्त एकच कर्मचारी होता. यामुळे मृतदेह उचलायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला. सकाळपासून मृतदेह घरातच असल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. यामुळे शेजारी राहणारा एक नागरिक मृतदेह उचलण्यासाठी मदत करण्यास तयार झाला. मदत करणाऱ्या शेजारील नागरिकाला पीपीई किट ऐवजी फक्त हातमौजे आणि मास्क दिला.
रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्याला मदत करीत तो व्यवस्थित बांधण्यात आला. मनपा कर्मचाऱ्याने तो मृतदेह मदत करणाऱ्या शेजाऱ्याला रुग्णवाहिकेत ठेवण्यास सांगितले. मात्र मयत व्यक्तीचे वजन जादा असून आपण एकटा ठेवू शकणार नसल्याचे शेजाऱ्याने सांगितले. मग मी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यास मदत करतो मात्र त्यासाठी तुम्ही पैसे द्या, असे मनपा कर्मचाऱ्याने सांगितले.
आम्ही तुमची मदत करीत आहोत आणि तुम्ही आमच्याकडे पैसे का मागताय, असा सवाल शेजाऱ्याने केल्यावर मनपा कर्मचारी संतापला. आम्ही मृतदेह इथेच ठेवून जातो, तुम्हाला काय करायचे ते करा, असे तो म्हणाला. शेजारी काहीतरी आठकाठी घालतोय, असे वाटल्याने पोलिसांनी शेजाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. मात्र वस्तुस्थिती समजल्यावर पोलिसांनी त्या मनपा कर्मचाऱ्यास कडक शब्दांत समज दिली.
महापौरांच्या प्रभागात पैसे मागण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. एकतर महापालिकेने मृतदेह उचलण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका पाठविली नाही, सायंकाळी रुग्णवाहिका पाठविल्यावर फक्त एकच कर्मचारी पाठविला आणि त्यानंतर मृतदेह उचलण्यासाठी पैशाची मागणी केली. यामुळे महापालिकेच्या असंवेदनशीलतेचे दर्शन झाले.
“महापालिकेच्या कर्मचाऱ्याने सांगवीतील मृतदेह उचलण्यासाठी पैशाची मागणी केल्याबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. आपल्याकडे या प्रकाराची माहिती मिळाल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल.”
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका