वाघोली- येथे चार करोनाचे रुग्ण सापडल्याने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी वाघोली प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याठिकाणी तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, स्थानिक लोकप्रतिनिधी व वाघोली ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संपूर्ण वाघोलीत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी 300 लोकांचा स्टाफ दाखल झाला आहे. सर्व्हेसाठी बहुसंख्य शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
यामध्ये कुटुंबातील व्यक्तींची आजारांची माहिती घेण्याचे काम केले जात आहे. सर्व्हेसाठी नागरिकांनी, हौसिंग सोसायटीतील चेअरमन/सचिव व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व्हे करण्यासाठी नकार देणाऱ्या किंवा आडकाठी आणणाऱ्या नागरिकांवर प्रशासनकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र भाडळे म्हणाले की, नागरिकांनी कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या प्रशासनाच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.