कायदेशीर कारवाई करण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा
पुणे : जगभरात करोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. या आजाराची लागण झालेले 15 रूग्ण पुण्यात आहेत. तर शासनाकडूनही गर्दी असणारी ठिकाणे बंद करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून परदेशातून आलेले नागरीक तसेच त्यांच्या कुटूंबियांवर सोसायटीतील कुटूंबे, शेजारी बहिष्क़ार टाकत आहे. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्यास सोसायटीच्या पदाधिकारी तसेच शेजाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीचे परिपत्रक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत.
या आजाराचे रूग्ण वाढत असतानाच काही नागरिक विदेशातुन प्रवास करुन भारतात दाखल झालेले आहेत. ते त्यांच्या घरामध्ये अलगीकरण कक्षामध्ये राहत आहेत. ते त्यांच्या घरात राहिल्याने सोसायटीतील इतर कुटुंबियांना संसर्ग होण्याची शक्यता नाही. मात्र, असे असतानाही, या आजाराच्या चूकीच्या माहितीमुळे तसेच संभ्रमामुळे कोरोना बाधीत व्यक्तींचे कुटुंब, परदेशातुन प्रवास करुन आलेले नागरिक व त्यांचे कुंटुबिय , तसेच रहिवास सोसायटीमध्ये अलगीकरण करुन ठेवण्यात आलेले व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांचेवर संबंधित रहिवास सोसायटीमधील चेअमन , सचिव, व सर्व सदस्य यांनी उपरोक्त नमद व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय यांना त्रास देणे त्यांचेवर बहिष्कार टाकला जात आहे. त्याबाबतच्या तक्रारीही जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी राम यांनी घेतली आहे. अशा प्रकारे चूकीच्या पध्दतीने एखाद्या व्यक्तीस अथवा कुटूंबास त्रास देण्यात येत असल्याचे निदार्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्हयातील सर्व रहिवास सोसायटी चेअरमन, सचिव व सर्व सदस्य तसेच सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, उपरोक्त नमुद नागरिक व त्यांचे कुंटुबिय यांचेवर
बहिष्कार टाकु नये, त्यांना विनाकारण त्रास देण्यात येऊ नये. सदरची बाब निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे व इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, या परिपत्रकानुसरा , अशा प्रकारे बहिष्कार टाकल्यास अथवा संबधित कुटूंबास त्रास दिला गेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सहा महिने कारावास अथवा एक हजार रूपयांपर्यंत दंड तसेच दोन्ही शिक्षाही संबधितांना होऊ शकतात.