‘इक्विटी’चे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद बीन महाफुद अल्लारादी यांचे गौरवोद्गार, आर्थिक गुंतवणूकही कंपनीत करणार
मंचर – मंचर येथील पराग मिल्क फुड्सची उत्पादने ग्राहकांना आकर्षित करणारी आहेत. गुणवत्ता आणि दर्जा यामुळे परागची उत्पादने जगाला गवसणी घालतील, असे गौरवोद्गार मनामा बहरेण (गल्फ) येथील प्रायव्हेट इक्विटी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद बीन महाफुद अल्लारादी यांनी काढले.
भारतात दुग्धजन्य पदार्थामधील ब्रॅंड म्हणून ओळख असलेल्या पराग मिल्क फुडस् कंपनीत मनामा बहरेण (गल्फ) येथील प्रायव्हेट इक्विटी कंपनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करणार आहे. प्रायव्हेट इक्विटी कंपनी ही जगातील आर्थिक गुंतवणूक करणारी नामवंत कंपनी आहे. पराग मिल्क फुडस् कंपनी व आंतरराष्ट्रीय भाग्यलक्ष्मी डेअरी प्रकल्पाची पाहणी अल्लारादी यांच्यासह प्रायव्हेट इक्विटी कंपनीचे मुख्य सहयोगी व्यवस्थापक गिरीश नाडकर्णी यांनी केली. मान्यवरांचे स्वागत पराग मिल्क फुडस्चे अध्यक्ष देवेंद्र शहा, कार्यकारी संचालक प्रितम शहा, संचालिका अक्षाली शहा यांनी केले.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथील 2 हजार 400 खेड्यांमधील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांकडून दूध घेतले जाते. दुधावर प्रक्रिया करुन विविध पदार्थ तयार केले जातात. देशांत पराग मिल्कच्या उत्पादनांचे तीन हजार वितरक आहेत. तर 31 देशांमध्ये ही उत्पादने विक्रीसाठी पाठवली जातात. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच पराग मिल्क फुडस्ने प्रगती केली आहे, अशी माहिती पराग मिल्क फुड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.