पिंपरी, (प्रतिनिधी) – कंपनीच्या मेलचा वापर करून कंपनीच्या नावाने माल खरेदी करून कर्मचार्याने पाच लाखांची फसवणूक केली. खालुंब्रे येथील एसीई इंजिनियरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडला.
कंपनीचे संचालक अंगत सतविंदरसिंग कालरा (वय ४०) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश तुकाराम नेवसे (वय ४२, रा. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने कंपनीचा लॅपटॉप वापरून कंपनीच्या मेलवरून व्हेंडरला मेल केले. व्हेंडरकडून आरोपीने माल खरेदी करून तो परस्पर विकला. बनावट बीलाचा वापर करून माल खरेदी केला. अशा प्रकारे आरोपीने कंपनीची ५ लाखांची फसवणूक केली. आरोपी कंपनीचा लॅपटॉप घेऊन पसार झाला. फौजदार गिरनार तपास करीत आहेत.