सातारा, (प्रतिनिधी) – देवकीनंदन, जानकी नायका, दशरथ पुत्रा अशा विविध आवाहनाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या सर्व राम मंदिरात रामनवमीनिमित्त रामलल्लाचा गजर झाला. आरती पाळणा गीते पूजा आणि सुंठवडा वाटप अशा विविध कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात राम नवमी पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली.
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील विविध श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र की जय ,जय श्रीराम जय घोषात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाला. प्रभू श्रीरामचंद्र की जय, सीतापति रामचंद्र की जय, जय श्रीराम ..अशा घोषणांनी यावेळी मंदिर परिसर दुमदुमून गेले होते.
दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान साजरा होणाऱ्या राम नवरात्राची सांगता आज झाली. बुधवारी दुपारी बारा वाजून 39 मिनिटांनी जन्म काळावर विविध मंदिरांमध्ये पाळण्यामध्ये श्रीफळ रूपी ठेवलेल्या श्रीरामचा जन्म करून त्याला सुवासिनींनी पाळणा व अंगाई गीते म्हणत जोजविले.
सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील परिसरातील काळाराम मंदिर व प्रतापगंज पेठ येथील गोराराम मंदिर तसेच सज्जनगड गोंदवले फलटण या विविध ठिकाणी राम मंदिरामध्ये रामजन्म काळ अनुभवण्यात आला. विविध ठिकाणी असणारी राम मंदिरे ही विद्युत रोषणाईने पूर्वसंध्येला उजळली होती.
सकाळी सात वाजल्यापासूनच रामजन्माची पाळणागीते महिला भाविकांनी म्हणून दिवसाची सुरुवात केली. राम लल्लाची महती सांगणारी भजने यावेळी म्हणण्यात आली. काळाराम मंदिर व गोराराम मंदिर येथे आरती, पाळणा गीते, भजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुजर आळी येथील काळाराम मंदिरामध्ये राम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीच्या निमित्ताने येथील सप्ताहाची विधिवत सांगता झाली जन्मकाळ आरतीनंतर येथील भाविकांना सुंठवडा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच महाजन वाडा येथे रामनवमीनिमित्त माऊली रक्तपेढीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. सातारा शहरातील गेंडामाळ- शाहूपुरी परिसरातील श्रीराम ध्यान मंदिरात रामनवमीनिमित्त यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते.
दुपारी रामनाम म्हणत जन्म काळाचे वेळी फुलांची पुष्पवृष्टी करून सायंकाळी कथक नृत्यलयाच्या वतीने कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. गोंदवले येथील थोरले राम मंदिर व धाकटे राम मंदिर येथे भाविकांची राम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
सज्जनगडावर सुद्धा रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सज्जनगडावर जाण्यासाठी सातारा मध्यवर्ती आगाराच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. रामनवमीनिमित्त आरती झाल्यानंतर सज्जनगडावर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
फलटण येथील राम मंदिरामध्ये सुद्धा रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीच्या निमित्ताने भजन आणि संगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी रामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
दरम्यान अयोध्या येथील श्री राम मंदिराचा जन्मोत्सव सोहळा हजारो सातारकर भक्तांनी आपल्या घरी बसूनच दूरदर्शन वरून याची देही याची डोळा पद्धतीने अनुभवून श्रीरामाच्या नामाचा गजर करत हा रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा केला. सातारा शहरातील मोदी पेढे वाले यांच्यावतीने विशेष प्रकारचे कंदीपेढे अयोध्या येथील रामलल्लाच्या मंदिरासाठी पाठवण्याची सोय करण्यात आली होती. सातारा शहरातून तब्बल 55 ऑर्डर नोंदवल्या गेल्याचे दुकानाचे मालक प्रशांत मोदी यांनी सांगितले.