पळसदेव, (वार्ताहर) – उजनी धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्याने पळसदेव (ता. इंदापूर) येथील अतिप्राचीन पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे. मंदिर पाण्याबाहेर आल्याने पर्यटकांची पावले पळसदेव गावाकडे वाळू लागली आहे. सध्या काही प्रमाणात शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, प्राचीन पळसनाथाच्या दर्शनासाठी ग्रामस्थांकडून मोफत होडी प्रवास उपलब्ध करण्यात आल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उजनी धरणाच्या निर्मिती नंतर 1978 ला धरणात प्रथम पाणी धरण्यात आले. या 46 वर्षात मंदिर फक्त 5 वेळा पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. यामध्ये 24 वर्षांनी प्रथम 2002 मध्ये मंदिर पाण्याबाहेर आले होते. त्यानंतर 2013 व 2017 व मागील वर्षी म्हणजे 2023 ला चौथ्यांदा मंदिर पाण्याबाहेर आले होते.
मागच्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस मंदिर पाचव्यांदा पूर्ण पाण्याबाहेर आले आहे. या वर्षी पाऊस येऊन धरणात पाणी येण्यास जून जुलै महिना उजाडणार त्यामुळे या वर्षी किमान 4 महिने मंदिर पाण्याबाहेर राहील, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. मंदिर पाण्याबाहेर आल्याने सध्या पळसदेव येथील जुने पळसनाथ मंदिर पाहणायसाठी भाविक गर्दी करत आहेत
पळसदेव येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना व अभ्यासकांना सेवा मिळावी यासाठी येथील मच्छीमारांच्या वतीने हनुमान जयंतीपर्यंत मोफत होडीची सेवा दिली जाणार असल्याची माहिती युवराज नगरे यांनी दिली. नागरिकांना मंदिरापर्यंत होडीने मोफत ने-आण करण्याची सेवा कांतीलाल नगरे, पोपट नागरे, भीमराव नगरे, लाला मुलाणी, युवराज नगरे, दादा केवटे, बलभीम भोई, केशव नगरे, अक्षय चमरे, आदित्य नगरे, सिद्धी भोई, नवनाथ नगरे, समाधान नगरे, नंदकुमार कुंभार, विजय चमरे यांच्यासह मच्छीमार बांधव सेवा देत आहेत.