काेल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीवर २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धन लेपाला तडे गेल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. महालक्ष्मीची मूर्ती भक्कम करण्याकरता इथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बुजवता येतील.
तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावेत, असे निरीक्षण पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांनी निरीक्षणानंतर नोंदवले. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल ४ एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये प्रतिवादी गजानन मुनीश्वर व इतर यांनी पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार १४ मार्च व १५ मार्च २०२४ रोजी करवीर निवासिनीच्या मूर्तीची पाहणी झाली. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर झाला. आठ पानांच्या या अहवालात त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून,
ती झीज २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. त्याचबरोबर देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यांवर तडे गेले असून ते तडे या २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याला गेलेले आहेत. तरी चेहरा व किरीट या भागाचे संवर्धन गरजेचे आहे.
नाजूक सुती कपड्याने पुसावे
रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घेणे, मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे, मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सवमूर्तीला फुलांचे हार घालणे, गर्भगृहातील संगमरवर काढणे, कीटकांचा उपद्रव होऊ नये याकरता योग्य ती उपाययोजना करणे सुचवले आहे.
म्हणून निघत आहे थर
या संवर्धन प्रक्रियेसाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचे अनुमान तज्ज्ञांनी काढले. त्याचबरोबर अन्य ठिकाणच्या लेपालादेखील तडे असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्यासाठी इथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बुजवता येतील, असे सांगण्यात आले आहे.