देर अल बलाह (गाझा पट्टी) – गाझातील सर्वात मोठ्या अल शिफा रुग्णालयातील कारवाई संपवून इस्रायली सैन्याने आज माघार घेतली. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायली सैन्याकडून या रुग्णालयाच्या आवारात शोधमोहीम सुरू होती.
काल आणि त्यापूर्वी हमासच्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारण्याच्या कारवाईदरम्यान या रुग्णायचे मोठे नुकसान झाले आहे. आवारातील काही इमारती आग लागल्यामुळे नष्ट झाल्या आहेत. तर वैद्यकीय सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अल शिफा रुग्णालयातील कारवाई पूर्णपणे यशस्वी झाल्याचे आयडीएफने म्हटले आहे. हमासचे अनेक दहशतवादी आणि अन्य संघटनांच्या सदस्यांना संपवल्याचा दावाही आयडीएफने केला आहे.
पहिल्या छाप्यानंतर भुयारांमधून या रुग्णालयाच्या तळघरात पुन्हा दहशतवादी जमा झाल्याच्या संशयावरून काल पुन्हा कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान काही रुग्ण देखील मारले गेल्याचा आरोप होतो आहे. मात्र आयडीएफने हा दावा फेटाळला आहे. रुग्णांना सुरक्षित कक्षांमध्ये हलवण्यात आले होते, असे इस्रायली सैनिकांनी म्हटले आहे.