वीसगाव खोरे, (वार्ताहर) – पान्हवळ (ता.भ़ोर) येथील राहुल सुरेश धनावडे याने आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना, अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर इंग्लंडमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त करुन आई वडिलांच्या कष्टांचे चीज केले आहे. त्यामुळे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुबातील राहुलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण पान्हवळ प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत, दहावीपर्यंतचे शिक्षण नागेश्वर विद्यालय आंबवडे, मेकॅनिकल इंजिनीअरिंग राजगड ज्ञानपीठच्या धांगवडी कॉलेज येथे झाले. हैद्राबाद युनिव्हर्सिटीमध्ये डेटा सायन्स, तर युकेमधून पदवी घेतली. राहुलने सप्टेंबर २२ मध्ये इंग्लड येथे रुम घेऊन पार्ट टाईम जॉब करत होणाऱ्या कमाईतून रोजचा खर्च भागवत असे. तर शिक्षणाचा खर्च आईवडिलांनी कर्ज काढून भागवला. इंजिनियरिंग करत असताना घरी शेतात मदत केली.
दहावी शिकलेले राहुलचे वडील सुरेश धनावडे व सहावी शिकलेली आई सुनिता या शेती करुन उदरनिर्वाह करतात. शेतात ऊस, टोमॅटो, भात, वांगी, काकडी, मिरची, भुईमुग, अशी पिक घेत पुरेपुर वेळ शेतात काबाडकष्ट करून आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याच्या आईने घरातील सर्व कारभार पाहून शेतात पतीला कायम साथ दिली.
शेतीत काबाडकष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. राहुलच्या या यशा बरोबरच भाऊ अजय याने हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त केली आहे. तर, किरण हा एमपीएससी परीक्षा देत आहे.