लोणंद, (प्रतिनिधी) – काळज, ता. फलटण येथून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा लोणंद पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन शोध घेत, तिच्यासह संशयिताला परत आणण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी गणेश माणिक अवघडे (रा. गोंदवले, ता. माण, सध्या रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, काळज (बडेखान), ता. येथील 14 वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित मुलगी बिहारमध्ये असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी निष्पन्न केले. ही मुलगी गणेश अवघडे याच्यासोबत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांची परवानगी घेऊन, हवालदार सर्जेराव सूळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन लाळगे आणि ऋतुजा शिंदे यांचे पथक बिहारमध्ये पाठवण्यात आले. त्यांना सपोनि सुशील भोसले आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस पथकाने बिहारमध्ये शोध घेतला असता, संबंधित मुलगी गणेश अवघडे याच्यासोबत काल (दि. 24) दुपारी 12 च्या सुमारास सापडली. संबंधित मुलगी आणि संशयितास घेऊन पोलीस पथक लोणंद पोलीस ठाण्यात आले. या कामगिरीबद्दल लोणंद पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनीही लोणंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.