निमोणे – शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Armed robbery in Shirur taluka Woman killed )
फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे व त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे रविवारी (ता. १७) रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले.
आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलांबई या गंभीर जखमी झाल्या होत्या. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ठोंबरे यांच्या आरडा ओरड्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यामुळे दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून, सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.