पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पर्वती जलकेंद्राकडून संपूर्ण जंगली महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच डेक्कन परिसराला पाणी पुरवठा करणारी सुमारे ४५० मिमी व्यासाची जलवाहिनी बुधवारी पहाटे रात्री १२:३०च्या सुमारास फुटली.
याची माहिती असतानाही महापालिकेकडून तब्बल १० तास काहीच उपाय योजना करण्यात आली नाही. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. बुधवारी सकाळी ११:०० वाजता या जलवाहिनीचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ही जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली.
दरम्यान, गळतीचे पाणी महापालिकेने या भागात नव्याने टाकण्यात आलेल्या पावसाळी जलवाहिनीतून थेट भिडे पूलाच्या परिसरात आल्याने नदीपात्रातील रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते. परिणामी, या भागात चिखल झाल्याने काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.
…तरी दुरूस्ती केली नाही
जंगली महाराज रस्त्यावरील पूरस्थिती रोखण्यासाठी डेक्कन परिसरात पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना येथील जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने ती फुटली.
या जलवाहिनीतून २४ तास पाणी पुरवठा सुरू असतो. रात्री १२:३० पासूनच पाणी वाया जात होते. रात्री ०२:००च्या सुमारास महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर तपासणी केली परंतु, पाणी बंद केले तर सकाळी त्या भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होईल, या कारणातून प्रशासनाने पाणी गळती तशीच सुरू ठेवली.
त्यानंतर सकाळी १०:३० वाजता या जलवाहिनीचा शास्त्री नगर रस्त्यावरील तसेच बाजीराव रस्त्यावरील व्हाॅल्व बंद करत दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र तो पर्यंत १० तासांत लाखो लीटर पाणी वाया गेले होते.