बेल्हे, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवारी (दि. 5) रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला.
मंगेश रामदास गुंजाळ (वय 26 रा. कांदळी, ता.जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुंजाळ हे रविवारी (दि. 3) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतारठिके वस्तीवर असलेल्या डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर उडी मारल्याने मंगेश हे मोटारसायकल घेऊन खाली पडले. याचवेळी संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण पाठीमागून मोटारसायकलवर येत होते.
मंगेश यांच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. या घटनेत मंगेश यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती ; मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुत्यू झाला आहे.
मंगेश गुंजाळ हा युवक कांदळी येथील आनंदनगरमध्ये राहत होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती वडिलांचे वर्षांपूर्वीच निधन झाले आहे तर 20 वर्षांपूर्वीच आईचेही निधन झाले आहे. मंगेश यांना चार बहिणी असून तीन बहिणी विवाहित आहे. शेतात कष्ट व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चावत होते; परंतु मंगेशवर बिबट्याने हल्ला केला व यामध्ये त्याला आपले प्राण गमवावे. त्यांच्या मुत्यूला बिबट्याच कारणीभूत असल्याने त्यांच्या परिवारास वन विभागाने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.