हडपसर : महंमदवाडी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसे पाणी देण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी दिले होते. त्यानुसार आज महापालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन रहेजा विस्टा सोसायटी परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. संगेरीया ते रहेजा विस्टा सोसायटी अशी नवीन पाण्याची लाईन टाकून या भागाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली.
रहेजा विस्टा सोसायटीच्या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या आहे. ती सोडवण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्याला अपेक्षित यश येत नव्हते. परंतु आज शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी वर्गाशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. झालेल्या चर्चेनंतर तत्काळ संगेरीया सोसायटी येथील बूस्टर मधून नवीन पाईपलाईन टाकून रहेजा विस्टा सोसायटी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठरले, असून त्यानुसार कामही सुरू करण्यात आले आहे, असे भानगिरे यांनी सांगितले.
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, लष्कर पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, समान पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, लष्कर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा, उपअभियंता संजय बोरसे, नितीन खुडे, कनिष्ठ अभियंता सोमनाथ वासकर आदीजण यावेळी उपस्थित होते.
रहेजा विस्टा सोसायटी हा भाग उंचीवर आहे. याठिकाणी पुरेसा दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी दोराबजी येथील बांधून पूर्ण असलेल्या तीन टाक्याचे अनुषंगाने पाणीपरवठा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे नाना भानगिरे यांनी यावेळी सांगितले.