बीजिंग – चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदावरून हटवण्यात आलेले नेते किन गांग यांनी आज आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दीर्घकालापासून संसदेत अनुपस्थित राहिल्या कारणामुळे गांग यांना गेल्या वर्षी तडकाफडकी परराष्ट्र मंत्रीपदावरून हटवण्यात आले होते.
त्यापूर्वीपासूनच ते बेपत्ता होते. पुढील आठवड्यात चीनच्या राष्ट्रीय संसदेचे वार्षिक अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी गांग यांनी आपला संसद सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला आहे.
किन गांग यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे, असे सत्तारुढ नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने म्हटले आहे. अधिवेशनासाठी सदस्य या नात्याने उपस्थित न राहण्यासाठीच गांग यांनी हा राजीनामा दिला आहे.
पक्षाच्या दोरणांना अनुसरूनच सर्व निर्णय सरकारमध्ये घेतले जायला हवेत, हा चीनमध्ये दंडक असल्यामुळे अधिवेशनापूर्वी वादगर्स्त नेत्यांचे राजीनामे आगोदरच घेतले जात असतात.
गांग यांना पक्षातून काढून टाकले गेले नाही, किंवा त्यांची हकालपट्टी देखील केली गेलेली नाही. त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने सांगण्यात आले आहे.