Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने अल्पावधीतच सिनेसृष्टीत यश मिळवले आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सारा चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक रेट्रो लूक शेअर केला आहे. तिचा लुक पाहून अनेकांना जुन्या चित्रपटांची आठवण झाली.
अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली. यात साराने गुलाबी रंगाची प्रिंटेड जॉर्जेट साडी परिधान केली आहे आणि जुन्या दशकातील अभिनेत्रींसारखी हेअरस्टाईल सुद्धा केली आहे. ‘हमजोली’ चित्रपटातील ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ या गाण्यावर बॅडमिंटन खेळत सारा डान्स करताना दिसते.
View this post on Instagram
या व्हिडिओला साराने “काश मैं बन सकती बडी अम्मा धिस इज अ रिअर हार्टफेल्ट तमन्ना,” असे कॅप्शन दिले आहे. या रेट्रो लूकमधील व्हिडीओमध्ये सारा आजी शर्मिला टागोर यांच्या जुन्या चित्रपटातील भूमिकांप्रमाणे दिसत आहे. तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडला असून काहींनी तिला ‘ज्युनियर शर्मिला’ असे म्हंटले आहे.
सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट येत्या 15 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सारा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटातही झळकणार आहे. त्यात ती स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.