पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि खडकी शिक्षण संस्था द्वारा संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी भारतभरातून आलेल्या सोळा विद्यापीठांच्या संघातील स्पर्धकांना शुभेच्छा देताना म्हणाले की, “खेळाडूंनी नेहमी खेळ हा खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे त्यामध्ये हार जीत होत असते म्हणून कुणाचाही द्वेष करू नये” असे त्यांनी यावेळी म्हटले.
देशाच्या विविध राज्यातून आलेल्या स्पर्धकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम खडकी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर म्हणाले की, टि. जे. महाविद्यालयास हॉकीची पंढरी म्हंटले जाते. खूप मोठी परंपरा या महाविद्यालयास आहे. या महावियालयातून अनेक क्रीडारत्न तयार झाले. याचा विद्यापीठास निश्चितच अभिमान आहे. म्हणूनच या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाने या महाविद्यालयास दिले.
या उद्घाटन समारंभास विद्यार्थी स्पर्धक, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. आलेल्या सर्व प्रशिक्षक आणि स्पर्धकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रमेश पेटकर यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, माजी क्रीडा संचालक दीपक माने, विद्यमान प्रभारी क्रीडा संचालक सुरेश पेटकर, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंदी छाजेड, वरिष्ठ सदस्य रमेश अवस्थे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.