नगर – जय श्रीराम…सीयावर रामचंद्र की जय…पवनसूत हनुमान की जय…अशा जयघोषात सोमवारी (२२ जानेवारी) नगरमध्ये आनंदोत्सव होणार आहे. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी नगरमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, लाडू-पेढे वाटप, फटाक्यांची आतषबाजी, हनुमान चालिका, रामचरित मानस गायन, गीत रामायण सादरीकरण तसेच सायंकाळी दीपोत्सव साजरा होणार आहे. राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केल्याने या आनंदोत्सवात सहभागी होणारांची संख्या लक्षणीय असणार आहे.
अयोध्येत सोमवारी श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी बारापासून त्याचे लाईव्ह प्रक्षेपण शहरात विविध ठिकाणी होणार आहे. याशिवाय शहरातील पाचशेवर मंदिरांतून स्वच्छता करून तेथेही प्रक्षेपण नियोजन सुरू आहे. मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवसभर येथे भजन, सत्संग व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मनसेतर्फे चौका-चौकात बुंदीचे लाडू वाटप केले जाणार आहे, असे मनविसे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांनी सांगितले. भुषणनगर परिसरातील नागरिकांना पणत्यांचे वाटप माजी मंडल अध्यक्ष साहेबराव विधाते व माजी शहराध्यक्षा आशाताई विधाते यांच्यावतीने करण्यात आले. या दिवशी सर्वांची सायंकाळी दिवे प्रज्वलीत करुन अभुतपूर्व सोहळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक भैय्या गंधे यांनी ५०१ प्रभू श्रीरामाच्या मूर्ती मान्यवरांना वाटप भेट देण्याच्या संकल्प केला असून, त्याचा प्रारंभ खा. डॉ. सुजय विखे यांना मूर्ती देऊन करण्यात आला.
लाडू व पेढे वाटप
बन्सीमहाराज मिठाईवाले जोशी परिवाराकडून नगर शहरातील मंदिरांमध्ये भाविकांना पेढ्यांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजकुमार जोशी व अशोक जोशी यांनी दिली. आडते बाजार येथील जोशी यांचे निवासस्थान येथे पेढे वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पेढे नेण्यासाठी मंदिराच्या पदाधिकार्यांनी मंदिराचा पुरावा म्हणून पावती किंवा लेटरपॅड बरोबर आणण्याचे व किमान पाचजणांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उद्या कारसेवक सन्मानम्म्
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उद्या रविवारी (२१ जानेवारी) सकाळी११ वाजता शिवालय येथे कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिली. अयोध्यात श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी कारसेवकांचे योगदान राहिले आहे, अशा नगर शहरातील कारसेवकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात येणार असल्याचे फुलसौंदर यांनी सांगितले