लोणी काळभोर – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दूध डेअरी मालकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात बुधवारी घडली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. आदित्य अशोक कवडे (वय. 22, रा. मनस्वी हाईट्स, जाधवनगर, हांडेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या इतर दोन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अविष्कार झांबरे (वय. 19, रा. झांबरे वस्ती, होळकरवाडी, पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी झांबरे यांची हांडेवाडी चौकात गुरुदत्त नावाची दुध डेअरी आहे. तर फिर्यादी झांबरे यांच्या ओळखीचे व परिचयाचे तिघे तरुण आहेत. तिन्ही तरुणांनी झांबरे यांच्या दुध डेअरी दुकानात घुसून त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी झांबरे व त्यांच्या कामगाराला शिवीगाळ व दमदाटी करुन लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन डेअरीतील फ्रिज व इतर साहित्य फोडून साहित्याचे नुकसान केले. तसेच डेअरीच्या गल्ल्यातील 2 ते 3 हजार रुपये रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून पळून गेले होते. याप्रकरणी झांबरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आदित्य कवडे याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.